मुंबई, दि. ११ : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ (आयएसएफ) आयोजित ‘वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप’ (अंडर-15 बॉईज व गर्ल्स) ४ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान शांग्लूओ, चीन येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यस्तरावरील निवडीसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नेरूळ जिमखाना, नेरूळ, नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक यांनी दिली आहे.
चीन येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवरील निवड चाचणी २५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी येथे घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागासाठी निवड चाचणी नेरूळ जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांतील १५ वर्षांखालील पात्र मुले व मुली या चाचणीत सहभागी होऊ शकतील. या निवडीतून विभागातील सर्वोत्तम पाच मुले व पाच मुली यांची निवड राज्यस्तरासाठी केली जाईल.
चाचणीसाठीचे निकष असे:
खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० नंतर आणि १ जानेवारी २०१४ पूर्वीचा असावा. इंग्रजीतील मूळ जन्म दाखला अनिवार्य, राष्ट्रीय चाचणीवेळी किमान सहा महिन्यांची वैधता असलेला भारतीय पासपोर्ट; विभागीय चाचणीवेळी पासपोर्ट अर्जाचा पुरावा सादर करणे, आधार कार्ड, पहिल्या इयत्तेच्या प्रवेशाची शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदणीची सत्यप्रत आवश्यक आहे. भोजन व्यवस्था खेळाडू किंवा संबंधित शाळेने स्वतः करावी, असेही विभागीय उपसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/