रामनगर येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; ग्राहकांना रानभाजी घेण्याची अपूर्व संधी
नागपूर, दि.11 : पाश्चिमात्य फास्टफुडपेक्षा आपल्याला निसर्गाकडून विविध चवींच्या व आरोग्याला हितकारक अशा रानभाज्या मिळालेल्या आहेत. श्रावण महिन्यात या आरोग्यदायी पौष्टिक व औषधी गुणयुक्त असलेल्या रानभाज्या मुबलक प्रमाणात आपल्या भोवताली उपलब्ध असतात. नागरिकांनी आरोग्याचे भान ठेवून फास्टफुडच्या आहारी जाणाऱ्या युवा पिढीपर्यंत पारंपारिक रानभाज्यांची चव व आरोग्यमूल्य पोहचवावेत, असे आवाहन कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रामनगर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदी उपस्थित होते.
अनेक आरोग्यवर्धक गोष्टी आपल्या भोवती मुबलक प्रमाणात निर्सगात उपलब्ध आहेत. नव्या पिढीपर्यंत या रानभाज्यांचे ज्ञान पोहचले पाहिजे. जूनी चव व नवी पिढी असे नाते युवकांच्या मनात निर्माण झाले पाहिजे, असे कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले. महिला बचतगटांनी यासाठी अधिक सजग होऊन पुढाकार घेतल्यास उमेदमार्फत त्यांना चालना देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी व ग्राहक यांचा थेट संपर्क जुळला पाहिजे. जिल्ह्यात बचतगटांना चालना देण्यासाठी आपण उमेद मॉल उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. हा दोन दिवसीय रानभाजी महोत्सव उद्या दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 पासून सुरु राहणार असल्याचे आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू यांनी सांगितले. जिल्हास्तरावरील या रानभाजी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर भेट द्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.