मुंबई, दि. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनाही पत्र लिहिले आहे. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधण्याच्या निर्देशांनुसार मंत्री लोढा यांच्याकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातील एफ उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत तक्रारी मांडल्या. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी करतात, कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
या अडचणींची मंत्री लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सायन-कोळीवाडा मतदारसंघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री लोढा यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार तमिळ सेल्वन यांनी त्यांच्या मतदारसंघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल मंत्री लोढा यांचे आभार मानले.
०००
संध्या गरवारे/विसंअ/