जळगाव दि. १२ (जिमाका): ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्नील सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूनंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘वीर जवान अमर रहे’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी साश्रुपूर्ण नयनांनी आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप वाघ, माजी सभापती विकास पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पना महाजन, माजी सैनिक फेडरेशन भडगांवचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील, हर्षल पाटील, शिवदास पाटील, वैशाली सूर्यवंशी, सुमित पाटील, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
०००