मुंबई, दि. १२ : मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभला बुधवार दि. १३ रोजी कुर्ला येथे सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पणही याच सोहळ्यात केले जाणार आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण होणार आहे. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडा महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांची विशेष उपस्थिती असून येत्या १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. मराठी मातीतले आपले पारंपरिक खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित केल्याची मंत्री लोढा यांनी दिली.
या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पुर्नवैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी म्हटले आहे.
क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ/