जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी- मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १२: विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्‌चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करणे, शिस्त अंगिकारणे आदी बाबी शिकणे आवश्यक आहे. स्काऊट, गाईड, एनसीसी, आरएसपी आदी माध्यमातून अशी शिस्त आणि संस्कार लाभतात. यामुळे इच्छुक विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आनंददायी शनिवार अंतर्गत स्काऊट गाईडचा एक तास घेण्याची तसेच ज्या शाळेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी असतील, तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश स्काऊट गाईडला अनुरुप असावा, असा प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/