मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, संचालक कृष्णकुमार पाटील, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या योजनेत सुटसुटीतपणा असावा असे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, यासाठी कमीत कमी कागदपत्रांची मागणी असावी. हे सानुग्रह अनुदान सध्या असलेल्या रकमेऐवजी वाढवून देण्याचा प्रस्ताव तीन आठवड्यात सादर करावा. या योजनेचा निधी वर्षाच्या सुरुवातीस मिळण्याविषयीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत, या प्रकरणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेत, अशा सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/