सातारा दि. १५- महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये, उभारणीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये सातारा जिल्ह्याने आणि सातारा जिल्ह्याने दिलेल्या नेतृत्वाने, वेळोवेळी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फार महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आज सातारा जिल्हा प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत राज्यातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये पुढे आहे. याचा मला अभिमान आहे. जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये अग्रभागी ठेवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व सहकारी मंत्री, सर्व खासदार व आमदारांच्या सहकार्याने व प्रशासनातील सहकारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, याला सर्वांचे सहकार्य राहो, असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोण समारंभ संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकीत्सक युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा वासियांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या जिल्ह्याला थोर स्वातंत्रसेनानीची, सैन्यदलातील थोर वीर सुपूत्रांची खूप मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी वेळप्रसंगी कारावास भोगून, भूमीगत राहून, प्राणांची आहूती देवून योगदान दिले. सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा सुद्धा खूप मोठी आहे अगदी महाराष्ट्र, गुजरात एकत्र मुंबई राज्य असताना सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे नेतृत्व केले.
सातारा जिल्ह्यामध्ये राज्यातले त्या काळातले 2000 मेगावॅट वीज निर्माण करणारे आणि 105 टीएमसी क्षमता असणारे सगळ्यात मोठे धरण आपल्या जिल्ह्यात आहे. ज्यावेळी पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू नव्हता त्यावेळी स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एका शब्दाखातर पाटण जावळी, व महाबळेश्वर या तीन तालुक्यातील 98 गावांचे पुनर्वसन करण्यात आले याचा आवर्जून उल्लेख करताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 2019 पासून धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने आपणही प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करत असताना करण्यात येत असलेल्या अनेक उपक्रम योजनांचा उल्लेख करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या 12 गडकोट किल्यांचा समावेश करण्यास युनेस्कोने मान्यता दिली आहे त्यातील 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातले आहेत. त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला आहे. यूनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये आपण मंजूर केले होते. पर्यटन विभागाकडून शिवप्रताप दिनाचे महत्त्व असलेल्या व अफजल वध झालेल्या ठिकाणी विव्हींग गॅलरी मंजूर केली आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा कसा होता व त्याचे महत्व हे चित्ररूपाने समजावे म्हणून पर्यटन विभागामार्फत संपूर्ण इतिहास दाखवण्याचे काम त्या ठिकाणी करणार आहोत.
सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर येण्यासाठी याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये महापर्यटन महोत्सव महाबळेश्वर येथे आयोजन करुन सातारा जिल्ह्याचे ब्रँडींग करण्याचे काम करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यामधील डोंगरी भागातील कला, युवक, महिलां व कलाकारांमधील विविध गुण राज्यस्तरावर पोहोचविण्या साठी यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय डोंगरी महोत्सवाचे आयोजन पाटण तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे. कोयनानगर येथील नेहरु उद्यानाचा जागतिक दर्जाच्या उद्यानाप्रमाणे विकास करण्यासाठी 75 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याला मंजूरी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार आहे.
जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी गेल्या वर्षी वार्षिक नियोजन आराखडा 671 कोटी रुपयांचा होता. या वर्षी जिल्ह्याचा वार्षिक नियोजन आराखडा 744 कोटींपर्यत वाढविला आहे असे सांगून जिल्ह्याला आपण जवळपास 100 कोटीरुपयांचा अधिकचा निधी आणू शकलो याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे परिवार, शहीद जवानांचे परिवार, सैन्य दलातले निवृत्त अधिकारी, उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी, नागरिक यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान व विविध पुरस्कारांचे वितरण
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हवलदार अनिल दिनकर कळसे, रेठरे खुर्द ता. कराड यांच्या वीर पत्नी सुनिता दिनकर कळसे यांना, शहीद काँस्टेबल सूर्वे नवनाथ, घरातघर (गांजे) ता. जावळी यांच्या वीरपत्नी श्रीमती शालन नवनाथ सुर्वे, शहीद काँस्टेबल पवार अमर शामराव, बावडा, ता. खंडाळा, यांच्या वीर पत्नी कोमल अमर पवार, वीरमाता श्रीमती सुरेखा शामराव पावर तसेच वीरपिता शामराव महादेव पवार यांना सेवारत शिपाई इंगवले सागर हणमंत, चिंचणेर निंब ता. सातारा यांना दुखापत झाल्यामुळे 90 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती निशा इंगवले, सेवारत नायब सुभेदार पिसाळ संतोष तानाजी, फडतरवाडी, ता. सातारा हे कर्तव्य पार पाडत असताना दुखापत झाल्यामुळे 30 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता संतोष पिसाळ यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच जमीन वाटपाचे दस्तऐवज वाटप करण्यात आले. सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून वीर नारी शेतकरी उत्पादक कंपनीला जलसंचय आणि बागायती लागवड समर्थनासाठी 11 लाख 95 हजार रुपयांचा धनोदश देऊन सन्मानीत करण्यात आले. बाळासाहेब भालचीम यांना राष्ट्रपती पदक घोषीत झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 100 दिवस कार्यालयीन सुधारणांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय, सातारा या कार्यालयांचा पालकमंत्री यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबराबर अवयव दात्यांना प्रमाणपत्र व जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा, व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा पुरस्काराचे, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी केले.
तत्पूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण केले.
0000