- पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
नांदेड दि. १५: नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदने “जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” सेवा विकसित केली आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नांदेड जिल्हा परिषदेने या व्हाट्सअॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.
“जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” या एकात्मिक माहिती पोर्टलचा शुभारंभ पालकमंत्री सावे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचा कणा असून यापूर्वी नागरिकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून संपूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ही सुविधा केवळ माहितीपुरती मर्यादीत नाही तर पारदर्शकता, वेळेची बचत आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढवणारी आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. नागरिकांना अधिक वेगवान व पारदर्शक सेवा मिळण्यासाठी या पोर्टलवरील ऑनलाईन सेवा नियमित अद्यावत ठेवण्याची सूचना पालकमंत्री सावे यांनी केली.
पोर्टलवरील सुविधा
डिजिटल युगात योजना आणि सुविधा थेट नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचवण्याची गरज होती. हाच विचार पुढे नेऊन जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र हे पोर्टल विकसित केले आहे. या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाज कल्याण, आरोग्य आदी सर्व विभागातील योजनांची माहिती एका क्लिकवर मिळेल. लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीची वेळ पोर्टलवरून निश्चित करता येते. योजनांबाबत व्हिडिओ क्लिप सहज पाहता येतील. अर्जाची सद्यस्थिती 48 तासात ऑनलाईन तपासता येते.
डिजिटल मित्र पोर्टलमुळे नांदेड जिल्हा ग्रामीण विकासाच्या डिजिटल क्रांतीत अग्रणी राहील आणि हे पोर्टल इतर जिल्ह्यांसाठी देखील एक आदर्श ठरेल. या उपक्रमाच्या यशासाठी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री सावे यांनी अभिनंदन केले.
दुर्गम भागासह जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ व जलद सेवा उपलब्ध करुन देण्याचा नांदेड जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या व्हाट्सअॅप सेवेद्वारे आपण शासकीय योजना, अर्जांची स्थिती आणि आवश्यक माहिती सहजपणे मिळवू शकता. घरी बसून एका क्लिकवर सेवा देण्याचा हा नांदेड जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी प्रास्ताविकात सांगितले. या सेवेचा गैरवापर झाल्यास, पूर्वसूचना न देता क्रमांक सेवा यादीतून वगळला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
आज या सोहळ्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2023-24 मधील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही झाले. पुरस्कार मिळालेल्या सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे पालकमंत्री सावे यांनी अभिनंदन केले. आपली गावे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे हीच खरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता उपक्रमात अनेक गावांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. यापुढेही आपली गावे स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-24 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2023-24 या वर्षासाठी घोषित झालेल्या पुरस्कारांत प्रथम क्रमांक भोकर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने मिळवून 6 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला तर द्वितीय क्रमांक हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतीने मिळवून 4 लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला. तृतीय क्रमांक कंधार तालुक्यातील चिंचोली प.क. ग्रामपंचायतीला मिळून 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय विशेष पुरस्कारांतर्गत स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी ग्रामपंचायतीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) भोकर तालुक्यातील खरबी ग्रामपंचायतीला तर स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बु. ग्रामपंचायतीला देण्यात आला. या विशेष पुरस्कारास प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजकुमार मुक्कावार यांनी मानले.
०००