- पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम
- विद्यार्थ्यांनी शांतता व शिस्त पाळावी
नांदेड दि. १५: नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात सुरक्षित, निर्भय वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेसोबत सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
आज कोनाळे कोचिंग क्लासेस येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कोचिंग क्लासेसचे आर.बी.जाधव, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
राज्यभरातून नीट, जेईई या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नांदेड शहरात येत आहेत. विद्यार्थी, महिला व मुलींना शहरात सुरक्षीततेची भावना, निर्भय वातावरण देण्याची जबाबदारी सर्वाची असून यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाशी समन्वय ठेवून सहकार्य करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांनी शांतता व शिस्त पाळली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांना आता पोलीस स्टेशनला न जाता असेल तेथून मोबाईवरुन तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी ९० ५० १०० १०० या हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले.
नांदेड शहराची शैक्षणिक प्रगती झपाटयाने होत असून ५० हजारहून अधिक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. नांदेडची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असून, गुणवत्तेसोबत शहराचे वातावरण निर्भय कसे राहील याचीही काळजी पोलीस विभागामार्फत घेतली जात आहे. यासाठी पोलीस विभाग कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे, शहराचे वातावरण सुरक्षित कसे राहील यासाठी टोल फ्री क्रमांक ११२ व स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली ॲपचे उद्घाटन आज पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते भव्य स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली काढण्यात आली.
शिक्षणासाठी नांदेडचे स्थान महत्त्वाचे असून येथील वातावरण निर्भय राहणे आवश्यक आहे. निर्भय वातावरणासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन, विद्यार्थी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर आहे. नांदेड शहर हे सुरक्षित शहर असुन येथील वातावरण सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. नांदेड हे शैक्षणिकदृष्टया महत्त्वाचे शहर असून येथे नीट व आयआयटीच्या तयारीसाठी राज्यातून विद्यार्थी येत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांला नांदेड शहरात सुरक्षित वातावरण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. नांदेड शहर सुरक्षित शहर करण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी विद्यार्थी, पालकांनी काहीही अडचणी आल्यास किंवा असुरक्षित वाटल्यास टोल फ्री क्रमांक किंवा ॲपद्वारे क्युआर कोड स्कॅन करुन पोलीसाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले.
०००