विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम राबविणार- मंत्री दादाजी भुसे

‘दशसूत्री’बाबत जाणून घेण्यासाठी मंत्री भुसे अचानक छत्रपती संभाजीनगरला

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका): शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे  शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘दशसूत्री’ या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी  जनार्दन विधाते, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. सतिष सातव, गीता तांदळे, सीताराम पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या वाचन कट्ट्यासही शिक्षण मंत्री भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसूत्री या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. त्यातील विविध घटक व त्याची फलश्रुती याबाबत माहिती दिली. त्यासोबतच बलक, युवक, महिला यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दशसुत्री व अन्य उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, राज्यासाठी नव्याने शैक्षणिक उपक्रमांचे ३६५दिवसांचे वेळापत्रक तयार केले जात आहे. ‘देश प्रथम’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची निश्चितच दखल घेऊ. शालेय शिक्षण विभाग उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीशी नेहमीच उभा राहील. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, ही बाब ध्यानात घेऊन त्याला अधिकाधिक आधुनिक शिक्षण देत असतांनाच त्याची नाळ ही मातीशी कशी जोडलेली राहील, याचाही विचार आम्ही करीत आहोत. त्यासाठी दशसुत्रीतील सुत्रे उपयुक्त ठरतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळांची व शिक्षणाची स्थिती बळकट करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांशी शाळा संवाद साधेल. शाळा अद्यावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल. त्यातून शाळांचे चित्र बदलेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

०००