स्वातंत्र्यलढ्यात प्राणपणाने लढलेल्या शूरवीरांचे योगदान अवर्णनीय – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण

Ø जिल्ह्यात 2 लाख 94 हजार शेतकऱ्यांना महासन्मान निधी

Ø 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा लाभ

Ø 81 उद्योग घटकांसोबत 1 हजार 603 कोटींचे गुंतवणूक करार

Ø जिल्ह्यात 3 हजार 249 प्रशिक्षणार्थ्यांना 17 कोटींचे विद्यावेतन

यवतमाळ, दि. १५ (जिमाका): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या लढ्यात स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक तरुण, शूरवीर सहभागी झाले होते. आपल्या जिवाची, घराची पर्वा न करता स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या या वीरांचे योगदान अवर्णनीय आहे. त्यांच्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याची पहाट आज आपण अनुभवत आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबिय, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांसह लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना नमन केले. स्वातंत्र्यानंतर देशासह राज्यात विविध विकासाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले. विविध घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासन करत आहे. शेती आणि शेतकरी नेहमीच प्राधान्याचे क्षेत्र राहिले आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्याच्या सूचना मी केल्या होत्या. आतापर्यंत 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 230 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केली. दोनही योजनेतून प्रत्येकी 6 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. शेतकऱ्यांना वीज बिलाच्या भारातून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार शेतकरी वीज बिलाच्या भारातून मुक्त झाले आहे.

सप्टेंबर ऑक्टोंबर- 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त जिल्ह्यातील 1 लाख 46 हजार शेतकऱ्यांना 155 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसामान्य तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र वाढविण्यावर आपला भर आहे. त्यामुळेच जिल्ह्यासाठी विशेष गुंतवणूक परिषद आपण आयोजित केली होती. या परिषदेत 81 उद्योग घटकांसोबत 1 हजार 603 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले आहे. यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी राज्य शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवित आहे. या योजनेतून गेल्यावर्षी आपण 612 उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील युवकांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. जिल्ह्यात 3 हजार 249 युवकांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत तब्बल 17 कोटी पेक्षी अधिक विद्यावेतन देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील 6 लाख 92 हजार महिलांना दरमहा दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने आदिशक्ती अभियान व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याची योजना सुरु केली आहे. योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

गृहिनींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून 570 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या येथे प्रभु श्रीराम मंदिराचे दर्शन घडविण्यात आले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून जिल्ह्यात 17 हजारावर जेष्ठ नागरिकांना प्रत्येकी 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.  इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास घरकुल योजना सुरु केली. या योजनेतून 29 हजार 999 घरे बांधली जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांचा उपचारावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. या खर्चातून दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. जिल्ह्यात 86 हजार रुग्णांना योजनेचा लाभ देण्यात आला तर 389 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर आहे. गेल्यावर्षी खनिज विकास निधीतून यंत्रसामुग्री व विविध सुविधांसाठी 18 कोटी रुपये महाविद्यालयास देण्यात आले. जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून सुमारे 100 कोटींची निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोणत्याही जिल्ह्याच्या विकासात रस्ते फार महत्त्वाचे असतात. नागपूर-तुळजापूर महामार्गासह अन्य काही महामार्ग नव्याने जिल्ह्यात झाले. या मार्गांची जिल्ह्याची एकून लांबी 315 किलोमीटर आहे. राज्य शासनाचा महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. जिल्ह्यात या मार्गाची लांबी 137 किलोमीटर आहे. वर्धा- यवतमाळ- नांदेड ही नवीन रेल्वे लाईन होत आहे. ही लाईन देखील जिल्ह्यातून जात असून जिल्ह्यातील तिची लांबी 188 किलोमीटर आहे. या मार्गांमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या स्तरावर विविध शासकीय योजना अधिक गतिमानपणे राबविणे आवश्यक आहे. यासाठी या संस्थांना प्रोत्साहन देण्याकरीता शासनाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान सुरु केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. त्यानंतर पोलिस, गृहरक्षक व विविध दलांच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांच्याहस्ते यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उल्लेखनिय यश मिळविलेल्या युवक युवतींसह, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००