अमरावती, दि. १५ (जिमाका): महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही एक चांगली पटसंख्या आहे. गरजू लोकांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ. यातून इमारती, स्वच्छतागृहे आणि पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महापालिकेच्या जेवडनगर येथील शाळेत सामूहिक कवायतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, मनपा आयुक्त सोम्या शर्मा, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी शिस्तबद्ध कवायतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम, नेतृत्वगुण विकसित होतील. कवायतीला देशभक्तीपर गाण्याची जोड दिली आहे, त्यामुळे लहान मुलांनी शिस्तबद्ध कवायत केली आहे.
शिक्षकांच्या सकारात्मक विचारांमुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रयोगशील शाळांना नक्कीच मदत करण्यात येईल. यासोबतच पालकांनीही विद्यार्थी शाळेत येतील याची काळजी घ्यावी. मुलं शिकल्याने कुटुंब, गाव आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. मुलांशी संवाद साधावा. मोबाईलचा वापर मर्यादित करून मुलांचे ज्ञान वाढेल यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांचे ज्ञान, गुणवत्ता, क्रीडा, कलागुण आदींना वाव देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
आमदार राणा यांनी शाळा दिवसेंदिवस प्रगती करीत असून या शाळेला कायम मदत करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कवायतीचे शिस्तबद्ध सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. सुरुवातीला लेझीम पथकाने मंत्री भुसे यांचे स्वागत केले, तसेच तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेतील मुलांनी तयार केलेल्या हस्तकला दालनाचे उद्घाटन मंत्री भुसे यांनी केले. समर्पण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
०००