कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण

  • निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
  • स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ

हिंगोली, दि. १५(जिमाका): सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवित आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करुयात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार  हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू उर्फ चंद्रकांत नवघरे, सर्वश्री माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, संतोष टारपे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील औंढा नागनाथसह पाच ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा हिंगोलीच्या पालक सचिव रिचा बागला यांची नियुक्ती करण्यात आल्या असून, या कामांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आराखडा 15 कोटी रुपयांचा आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचे सांगून यावर्षीही जिल्ह्यात “हर घर तिरंगा”हे अभियान राबविण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

“सेवादूत हिंगोली” ही वेब प्रणाली तसेच व्हाटस् अप चाटबोटच्या माध्यमातून नागरिकांना शासनाची हवी असलेली योजना, विविध कागदपत्रे सुलभरित्या घरपोच मिळणार आहे.  तसेच लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन, से टू हाय- व्हॉटस्अप (8545 08 8545) बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. ही सेवा नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने सोडविण्यात उपयोगात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी व कृषिपूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारी औजारे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे कार्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नामुळे ‘वसमत हळद’या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे.

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून 100 विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयात लवकरच हृदयरोग उपचारासाठी “कॅथ लॅब” कार्यान्वित होणार आहे. तसेच क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच स्त्री रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत सुरु होईल, असे सांगून गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी लवकरच एमआरआय सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागातील विभागासाठी “मुस्कान प्रमाणपत्र”मिळवणारा हिंगोली पहिला जिल्हा ठरला आहे. तर पोषण व पुनर्वसन केंद्र, बालरोग विभागास राज्य स्तरावरील द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या केंद्रामुळे कुपोषित बालकास लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी डीबीटीद्वारे 333 कोटी 15 लक्ष वाटप तर चालू वर्षी जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी वितरणाची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, स्वाधार योजना, रमाई आवास घरकुल योजनांचीही माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान कुसूम योजना व मागेल त्याला सौरकृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 33/11 केव्ही उपकेंद्राच्या देण्यात आलेल्या लाभाचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ई-साक्ष चा वापर ग्रामीण भागात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपला जिल्हा, राज्य आणि देशासमोर अनेक समस्या एकजुटीने सोडविण्याला प्राधान्य असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशपर भाषणातून सांगितले.

पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल वसमत ग्रामीण पोलीस स्टेनशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, सायबर सेलचे पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे यांना सेवापदक तसेच सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, दिलीप मोरे, माधव जिव्हारे, रविकिरण खंडारे यांचा सन्मान करण्यात आला. 100 दिवसाच्या मोहिमेत दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापनात राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रथम क्रमांक मिळविलेल्या उप अभियंता एम. एस. देशमुख, सहायक निबंधक सहकारी संस्था श्री. कलटेवाड, वसमत तालुका क्रीडा अधिकारी निलकंठ श्रावण, तृतीय क्रमांक मिळविलेल्या वसमत पंचायत समितीचे प्रफुल्ल तोटेवाड, कुरुंदा पोलीस स्टेशनचे रामदास निरदोडे, वसमत पशुधन विकास अधिकारी संजय सावंत, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे उप अभियंता शेख सलीम, कळमनुरी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अबॅकस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम करणाऱ्या विद्यार्थी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन 2023-24 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या घोटा, बोरी सावंत, दाताडा खु. या ग्रामपंचायतीस अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. किडनी  व नेत्रदान केलेल्या अवयतदात्यांचाही यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी व पालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणचा जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.

यावेळी पोलीस विभागातर्फे दाखल झालेल्या निर्भया पथकाला तसेच देसाई फाऊंडेशन ट्रस्ट व उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अँनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्री झिरवाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्त व अवयवदाची शपथ देण्यात आली.

देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

०००