कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई, दि १७: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे. या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात दरड कोसळणे, आणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

०००