जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आश्वस्त केले.

नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागपूरसह  वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली.यावेळी २८० लेखी निवेदने स्वीकारण्यात आली.यावेळी नागरिकांनी व्यक्तिशः भेट घेवून संवाद साधत आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्या लेखी स्वरुपात सादर केल्या.

विविध शिष्टमंडळांनीही यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. जनतेच्या समस्या, मागण्या समजून घेत यावर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देशही दिले.

०००