मुंबई, दि. १८: मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या, विस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गुंतवणूकदारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे, ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला अधोरेखित करणारी आहे. महाराष्ट्र शासन विकासासाठी कटिबद्ध असून, खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची केंद्रे उभारण्यात येत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार असून या ठिकाणी इनोवेशन हब होणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधन व ‘एआय’ आधारीत व्यवस्था असेल. तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतूसोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी – शिवडी लिंक रोड असेल, मुंबईच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणुकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम शासनस्तरावरून जलद पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र गुंतवणूक स्नेही राज्य आहे. इज ऑफ ड्यूइंग बिसनेससाठी सध्या काम सुरू आहे. गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही काम करत आहोत. कोणतीही अडचण आल्यास ती तत्परतेने सोडवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणुकदारांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोल्डमन सॅक्सचे नव्या कार्यालयासाठी अभिनंदन केले.
गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले की, भारतीय बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी म्हणाले की, हे नवे कार्यालय आमच्या भारतातील प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या नव्या जागेच्या रचनेत सहकार्य, नवोपक्रम आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे.
या कार्यालयाची थोडक्यात माहिती
या कार्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत, जसे की –
- अत्याधुनिक कॉन्फरन्स सेंटर
- झूम-सक्षम मीटिंग रूम्स
- माहिती सहयोग जागा (information collaboration space)
- फोकस रूम्स आणि टीम रूम्स
- उंची समायोजित करता येणारे डेस्क
- बहुउद्देशीय जागा आणि ऑन-साइट केटरिंगसह कॅफे
गोल्डमन सॅक्सची भारतातली कामगिरी
२०२१ पासून Dealogic नुसार भारतात गुंतवणूक बँक म्हणून मान्यता. २०२४ पासून आयपीओ आणि ब्लॉक ट्रेड्सद्वारे $10 अब्जांहून अधिक निधी उभारणारे प्रकल्प पूर्ण. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या आयपीओ आणि ब्लॉक ट्रेडचा समावेश. २००६ पासून भारतात $8.5 अब्जांहून अधिक भांडवली गुंतवणूक.
गोल्डमन सॅक्सने भारतात आपली सेवा १९८० च्या दशकात सुरू केली होती. २००६ मध्ये मुंबईत पूर्ण मालकीची उपस्थिती प्रस्थापित केली. सध्या कंपनी भारतात गुंतवणूक बँकिंग, इक्विटी विक्री आणि ट्रेडिंग, फिक्स्ड इनकम सिक्युरिटीज, अॅसेट मॅनेजमेंट आणि संशोधन अशा विविध सेवा पुरवते.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/