राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळेस २२ ऑगस्टपासून सुरुवात

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे मुंबईत आयोजन

मुंबई, दि. १८ : राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ आणि २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे.

राज्यस्तरावर कार्यरत आयोगांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे, महिलाविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच देशव्यापी कृती आराखडा तयार करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. देशभरातील महिलांसमोरील सामाजिक प्रश्न, धोरणात्मक मुद्दे व विविध विषयांवर सखोल चर्चा यावेळी होणार आहे.

कार्यशाळेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक अशा विविध राज्यांतील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्य यामध्ये सहभागी होत आहेत. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी वक्ते अनुभव व विचार मांडणार असून, १६० मान्यवरांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग व उत्तर प्रदेश महिला आयोग यांच्या सहकार्याने अशाच प्रकारची क्षमता बांधणी कार्यशाळा झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत होत असलेल्या या कार्यशाळेकडे देशभरातील महिला आयोगांचे लक्ष लागले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/