मुंबई, दि. १८: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. प्रथम रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
अमरावती विभागातील मदतीचा आढावा
(१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
बुलढाणा 443 3,67,89,000
अकोला 265 2,36,44,000
अमरावती 231 2,21,45,000
वाशीम 139 1,35,80,000
यवतमाळ 109 99,53,000
या आजारांसाठी मिळते मदत
- कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)
- हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण
- कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)
- रस्ते अपघात
- बालकांच्या शस्त्रक्रिया
- हिप व गुडघा रिप्लेसमेंट
- मेंदूचे आजार, डायलिसिस, अस्थिबंधन
- बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण
- नवजात शिशुंचे आजार इत्यादी २० प्रकारच्या गंभीर आजारांसाठी मदत प्रदान केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
- रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड
- रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)
- तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी)
- वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
- एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)
- ZTCC पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात पुढील ईमेलवर पाठवा: aao.cmrf-mh@gov.in
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 वर संपर्क साधावा.
“संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कक्षात केलेल्या विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत आणि खऱ्या गरजूंपर्यंत निधी पोहोचत आहे.”
— रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र
०००