छत्रपती संभाजीनगर, दि.१८, (विमाका): भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानीचे योग्य प्रकारे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, पर्यटन स्थळे, धबधबे व गर्दीची ठिकाणे येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी व आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जिल्हाधिकारी यांनी स्थानिक संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांना सुट्टी संदर्भातील निर्णय घ्यावा, स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांमध्ये योग्य सोयी-सुविधा, अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात आज रोजी ३२.३० मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, विभागातील ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच दि.१४.०८.२०२५ पुन १८.०८.२०२५ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार विभागातील एकूण १००४ गावे बाधित झालेली असून ०१ व्यक्ती जखमी तर ०६ व्यक्ती मयत (हिंगोली – ०१, नांदेड-०३, बीड-०२) झालेल्या आहे. तर एकूण २०५ जनावरे मयत (दुधाळ मोठी-६९,दुधाळ लहान-१०२,ओढकाम करणारी मोठी-२८, ओढकाम करणारी लहान-०६) झालेली आहे.तर अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण – ४८६ आहे.शेती पिक नुकसानीच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार एकूण ३,२९,५०९ शेतकरी बाधित झाले असून २,८०,८६१.०२ हे.आर क्षेत्राचे (जिरायत-२७२५०७.०२,बागायत-८१५८,फळपिक-१९६ हे.आर) नुकसान झाले आहे.
०००