मुंबई दि. 20 : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे. पूरस्थिती किंवा भूस्खलनामुळे धोक्यातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पावसामुळे शेतपिके, घरांची हानी किंवा इतर नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावे. तसेच रुग्णालये, शाळा, निवारा केंद्रे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक सेवा खंडित होऊ नयेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.
0000
एकनाथ पोवार/विसंअ/