कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्ट रोजीपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कालावधीत संबधित जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, पुणे घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुबई उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, रायगड जिल्ह्यातील अंबा, सावित्री या नद्यांनी धोका पातळी पार केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांची कंपनी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक, DRF नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (एनआरएससी) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे SACHET platform चा वापर करून हवामानाचे ४१ अलर्टद्वारे ५४ कोटी एसएमएस च्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले आहेत. तर मुंबईत २४ विविध ठिकाणी पाणी साचले होते, पाणी पंपाद्वारे निचरा करण्यात आले आहे. मुंबई येथील असणारी भरती व ओहोटी : ओहोटी – सायंकाळी ४:३५ १.९१ मीटर, भरती रात्री ९:५५ ३.३४ मीटर.
अलमट्टी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस आणि कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर ब्रिज) मधून होणारा विसर्ग लक्षात घेता, अलमट्टी धरणाकडे येणारा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच, नदीकडे जाणारा प्रवाह सध्याच्या २,००,००० क्युसेकवरून २० ऑगस्ट २०२५ रोजी २,५०,००० क्युसेकपर्यंत वाढवला जाईल.
मुंबई येथील वडाळा ते चेंबूर दरम्यान मोनोरेल मैत्रीपार्क येथे बंद पडली असता राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने समन्वय करून अग्निशमन दलास पाचारण केले व सदर मोनोरेल मध्ये ५८३ प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेत. सुर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा, भांडूप येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांची तात्पुरती निवास व्यवस्था जवळच असणाऱ्या एसआरए इमारतींमध्ये करण्यात आली होती व त्यांच्याकरिता खानपान व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील भोर येथील अंबाडे घाट येथील दरड कोसळली होती परंतु तत्काळ मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोरी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या ७० नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकामार्फत सुखरूप सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड व जलगाव गावतल्या रस्त्यावर पाणी साठल्याणे हा मार्गावरील वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली आहे.
सांगली शहरातील पूरग्रस्त भागातून ४७१ लोकांना बाहेर काढले आहे. पुराचे पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना स्थलांतरित करण्यात आले. बहुतेक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. काही लोक महानगरपालिकेच्या निवारागृहात देखील असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
0000
एकनाथ पोवार/विसंअ/