मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा आढावा

RAVI JADHAV

मुंबई, दि. २० : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानासह बाल संगोपन, मिशन वात्सल्य आणि मातृ वंदना योजना यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

RAVI JADHAV

मंत्रालयात आयोजित बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य समस्या, कुपोषण, बालमृत्यू व मातृमृत्यूचे प्रमाण कमी करणे, लैंगिक व शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे तसेच हिंसामुक्त कुटुंब व समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यभर ३६ जिल्ह्यांमध्ये व १५० तालुक्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर समिती गठित करण्याचे काम सुरू असून उर्वरित तालुक्यांमध्ये समित्या तातडीने स्थापन करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

कोरोना काळात सुरू झालेल्या एकल महिलांसाठीच्या योजनेची व्याप्ती वाढवून विधवा, परित्यक्ता व एकल महिला यांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले. बाल संगोपन योजनेसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मिशन वात्सल्य आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.

आयुक्त कैलास पगारे म्हणाले की, मातृ वंदना योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे शंभर टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून लाभार्थींना योजनेचा थेट फायदा होणार आहे.

 

०००

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/