विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
7

कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 : वस्तू व सेवाकर विभागामध्ये बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून विहीत पद्धतीने ई- निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते. या कंत्राटदारांद्वारे कर्मचाऱ्यांची सेवा पुरविली जाते. त्यांची नेमणूक कंत्राटदाराकडून विभागाच्या कार्यालयामधे करण्यात येते. त्यांची नियुक्ती करणे, त्यांना वेतन देणे, तसेच त्यांची सेवा खंडित करणे या बाबी कंत्राटदाराच्या स्तरावरून केल्या जातात. त्यामुळे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेतलेल्या लिपिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. पवार म्हणाले, सध्या वस्तू व सेवाकर विभागामध्ये 83 कंत्राटी लिपिक कार्यरत असून प्रत्येकी 15 हजार 753 रुपये एवढे मानधन निश्चित केले गेले आहे. यात कंत्राटी कर्मचारी याचा भविष्य निर्वाह निधी कंत्राटदाराने भरणे अपेक्षित आहे.

राज्यातील लिपिकांची पदभरती ही ‘एमपीएससी’ मार्फत होत असते. ‘एमपीएससी’ ने ही पदे  भरावीत. या जागा जाहीर झाल्यावर सध्या कार्यरत कंत्राटी लिपिकांनाही अर्ज करता येईल. ‘एमपीएससी’ मार्फतच स्थायी कर्मचारी भरती होईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, विक्रम काळे, श्रीमती मनिषा कायंदे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देणार जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 3 : एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल, असे  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा प्रदेशात कोकणातील नार पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण 89.85 अघफू पाणी वळविण्याबाबत आखणी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या पैकी 2.43 अ.घ.फू. पाणी वळणाच्या  बांधकामाधीन आहेत. 25.55 अ.घ.फू. पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, दमणगंगा पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा ते गोदावरी नदीजोड व दमणगंगा- पिंजाळ पूर्ण व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आले आहे. उर्वरित 61.88 अघफू पाणी वळविण्यासाठीच्या काही योजना प्रस्तावित तर काही प्रकल्पाधीन आहेत. अहमदनगर, जळगावसह मराठवाड्यातील क्षेत्र सिंचनाखाली आणणार आहे, असेही त्यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

या विषयी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री अंबादास दानवे, विनायक मेटे, सुरेश धस, शरद रणपिसे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

प्रत्येक जिल्ह्यात पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरु करणार

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.3 : कर्करोग, एचआयव्ही बाधित तसेच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपचार केंद्र पॅलिएटिव्ह केअर सेंटरहे राज्यात 17 जिल्ह्यात स्थापन झाले असून येत्या दोन वर्षात उर्वरित 19 जिल्ह्यात सुरु करण्यात येतील , अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

श्री. टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय  पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाअंतर्गत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येत आहे.  यासाठी आवश्यक असणारे औषधे, कर्मचारी वर्ग त्याचबरोबर निधीची कोणतीही कमतरता यासाठी  होणार नाही. जिल्हा रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअरसाठी दहा खाटा वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे यासाठी विशेष डॉक्टर आणि प्रशिक्षित परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भातील अभ्यासक्रमही लवकरच सुरु करू, असेही श्री.टोपे यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री. जगन्नाथ शिंदे, डॉ. रणजित पाटील, हेमंत टकले, गिरिशचंद्र व्यास आदिंनी सहभाग घेतला होता.

००००

अंगणवाडी सेविकांची सहा हजार रिक्त पदे भरणार

 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्त असलेली सुमारे सहा हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या, गेली पाच वर्षे अंगणवाडी सेविकांची पदे भरली गेली नव्हती. सन 2018 ला या सेविका तसेच त्यांच्या मदतनीस यांचे मानधनात वाढ करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या समन्वयाने त्यांना मानधन हे वेळेत दिले जावे  यासाठी काम करण्यात येईल.

या विषयी सदस्य सर्वश्री हेमंत टकले, भाई गिरकर, श्रीमती हुस्न बानो खलिफे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ प्रश्नोत्तरे विधान परिषद/3-3-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here