विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0
6

सातारा जिल्हा आढावा बैठक

मुंबई, दि. 3 : सातारा जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत.

असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.

उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील31 किलोमीटर वितरण प्रणालीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देऊन कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

सातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करताना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here