मुंबई, दि. 3 : महाराष्ट्राला संत, महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संतांची परंपरा पुढे चालू राहावी आणि वारकरी संप्रदायाचे संस्कारही या पिढीला मिळावेत, यासाठी वारकरी आणि संत वाङ्मय
यांचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने संतपीठाच्या अध्यासन केंद्राचा अहवाल तातडीने सादर करावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
विधानभवनात पैठण येथील संतपीठ तातडीने सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला आमदार अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते.
संतपीठाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी गठित केलेल्या समितीने याबद्दलचा अहवाल तातडीने सादर करावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.