विधानसभा इतर कामकाज

0
6

अनाथांना एक टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतएमपीएससी’, ‘साप्रवियांची लवकरच संयुक्त बैठक- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 : अनाथ मुलांना खुल्या संवर्गात एक टक्के आरक्षणाबाबत निर्णयाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांची लवकरच बैठक घेतली जाईल. सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राखली जाईल. पूर्वीच्या सरकारने सुरु केलेली कामे बंद करण्याची या शासनाची भूमिका नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षणाचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात बनावट अनाथ प्रमाणपत्र धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर मार्ग काढला जाईल. त्यासाठी अर्थसंकल्प झाल्यानंतर सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सारथी संस्था सुरु राहील अशी ग्वाही देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, या संस्थेत शासनाच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झाल्याचे आढळले नाही. या संस्थेतील अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सारथी संस्थेला मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या शासनाने सुरु केलेली कामे बंद करण्याची भूमिका नाही. एखाद्या कामाबद्दल अथवा योजनेबद्दल तक्रार आली तर त्याची चौकशी केली जाते, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य विभागात जी पदे गरजेची आहेत ती रिक्त असून उच्चाधिकार समितीनेदेखील ही पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील पदे लवकरच भरली जातील असेही त्यांनी सांगितले.

००००

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 3 : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर निवेदन करताना गृहमंत्री बोलत होते. ते म्हणाले, 24 फेब्रुवारीला ही घटना झाली असून त्यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या जोडप्याला त्या महिलेचे वडील, भाऊ, चुलत भाऊ, दीर मारहाण करण्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात संशयितांमध्ये कुटुंबातील सदस्य असून यातील तथ्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/3.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here