विधानपरिषद लक्षवेधी

अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. 3 : अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत पदभरती करण्यात  येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रा. अनिल सोले यांनी नागपूर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त पदांविषयीची लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. शिंगणे बोलत होते. अन्न व औषध प्रशासनात विविध संवर्गात ११८३ पदे मंजूर आहेत.  यात अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळांतील एकूण १०३ तांत्रिक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उच्चस्तरीय  सचिव समितीची मान्यता  घेणे आवश्यक आहे. त्यानुसार समितीची मान्यता घेऊन पदभरती करण्यात येईल. अन्न चाचणी प्रयोगशाळा ही अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्यात  येईल. सद्यस्थितीत नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद येथे अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. येत्या काळात नाशिक, पुणे येथेही अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येईल, असे श्री. शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, नागो गाणार, अंबादास दानवे, गिरीश व्यास यांनी भाग घेतला.

००००

सारथीप्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 3 : राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या दहा दिवसात येणार असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.वडेट्टीवार बोलत होते. राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात या संस्थेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

सारथी गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चैाकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चैाकशी करण्यासाठी श्री. कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. सारथी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचे पैसे थकित असल्यास ते येत्या १५ दिवसाच्या आत दिले जातील, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. 

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री महादेव जानकर, भाई गिरकर, सुरेश धस यांनी भाग घेतला.

००००   

                         

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 3 : मुंबईत कर्करोग झालेल्या रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी विधानपरिषदेत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील सोयीसुविधांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाला लवकरच दीडशे वर्ष पूर्ण होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात येणार आहे. यादरम्यान जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग कार्यरत असून या संस्थेत कुठलीही हृदय शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नाहीत. अपुऱ्या औषध पुरवठ्याअभावी कोणत्याही शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नसून रुग्णसेवा अखंडित सुरू असल्याचे श्री. देशमुख यांनी  यावेळी सांगितले.

विधिमंडळ सदस्यांसाठी औषधोपचाराची एक योजना यापूर्वी अस्तित्वात होती. ती सध्या स्थगित आहे. मात्र, केवळ विधानसभा आणि विधानपरिषदच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेच्या राज्यातील सदस्यांसाठी एक वेगळी योजना आणण्यासंदर्भात धोरण आखण्यात येईल, असे श्री. देशमुख यांनी या लक्षवेधीवरील एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य विक्रम काळे, भाई गिरकर, अमरनाथ राजूरकर, अनंतराव गाडगीळ, डॉ.परिणय फुके यांनी भाग घेतला.

००००

अंमली पदार्थांपासून तरुणाईला रोखण्यासाठी

स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 3 : अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कायदेशीर कठोर उपाययोनांबरोबरच जनजागृतीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचीही जनजागृतीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला रोखण्याच्या उपाययोजनांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कार्यशाळा, जनजागृती पंधरवडाजनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे. यासोबतच आपल्या पाल्यांवर पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग हा अंमली पदार्थांचा विळखा रोखण्यासाठी महत्त्वूर्ण ठरणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अंबादास दानवेविजय उर्फ भाई गिरकरवजाहत मिर्झारामदास आंबटकरडॉ. परिणय फुके यांनी भाग घेतला   

००००

नवे वीज धोरण लवकरच

शंभर युनिटपर्यंत वीज मोफत; शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज देण्याचे प्रस्तावित – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. 3 : राज्यातील वीज दर कमी व्हावा यासंबंधी विस्तृत अभ्यास करून येत्या तीन महिन्यात नवे वीज धोरण आणले जाईल. यात शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे तसेच शेतकऱ्यांना दिवसादेखील चार तास वीज देण्याचे प्रस्तावित आहेअसे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. सदस्य प्रकाश गजभिये यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

डॉ.  राऊत म्हणाले, देशात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त वीज दर राज्यात आहे,  मात्र यामागील कारणे समजून घेतली पाहिजेत. वीजनिर्मिती स्त्रोतांमधील भिन्नतात्या अनुषंगाने बदलणारी वीज खरेदी किंमतग्राहक वर्गवारी व ग्राहकांच्या वीज वापरांमधील वैविध्यतुलनेने मोठे भौगोलिक क्षेत्र इ. बाबींची तुलना इतर राज्यांशी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक राज्यातील नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. उदा. छत्तीसगड मध्ये कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तेथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे कोळसा खाणीच्या तोंडावर आहेत (पीट हेड स्टेशन्स). या उलट महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती केंद्रासाठी लांबच्या राज्यातून (जसे ओरिसा इ.) कोळसा आयात करावा लागतो. त्यामुळे वहनाचा खर्च वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता वेगवेगळ्या राज्यातील वीजदरांची तुलना महाराष्ट्र राज्याशी करणे योग्य होणार नाही.

तीन महिन्यात तोडगा

विद्युत निर्मिती केंद्रातील होणारी गळती त्याचप्रमाणे वीज वितरणातील गळती कमी करून वीज दर आटोक्यात आणण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे या सर्व बाबींवर येत्या तीन महिन्यात तोडगा काढून वीज दर कमी करता येईल का, तसेच शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देता येईल का याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल.

थकबाकी भरण्यात शेतकऱ्यांना मदत करु

शेतकऱ्यांना रात्रीच्या कालावधीत वीज देण्यात येते, यात सर्पदंशबिबट्याचा हल्ला यासारख्या अनेक दुर्घटना होत असल्याचे लक्षात आले . ही अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा चार तासासाठी वीज देण्याच्या प्रस्तावाचा देखील विचार करण्यात येईल. राज्यात महावितरणची कृषीपंप ग्राहकांकडे माहे डिसेंबर 2019 अखेर रु 37996 कोटी इतकी थकबाकी आहे. तीन महिन्यांच्यावर थकित असलेल्या देयकांवर काही सवलत देऊनही थकबाकी भरण्याची सवलत शेतकऱ्यांना देण्यात येईल.  शेतकऱ्यांना ही वीज देयके भरावी यासाठी सर्व आमदारांनी त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आवाहन करावे, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.

वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न

महावितरण मीटरींग व बिलिंगसह विविध क्षेत्रात योग्य उपाययोजना करुन वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत  आहे. जेणेकरुन वीज खर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल. 2006.07 या वर्षातील 30.2 टक्के हानी सन 2018-19 अखेर 13.90 टक्के पर्यंत कमी करण्यात आली असून डिसेंबर 2019 अखेर महावितरणची वितरण हानी 13.1 टक्के पर्यंत कमी करण्यात आली आहे.

वीज वितरण यंत्रणेत सुधारणा व्हावी तसे गळती आणि वीज चोरी थांबावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, यात 43 भरारी पथकांची नियुक्तीएकात्मिक बिलींग पद्धतीस्मार्ट मीटरमानवी हस्तक्षेपाशिवाय रीडींगमोबाईल कलेक्शन एफीशीयन्सी यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

विदर्भमराठवाडा -औद्योगिक ग्राहकांना वीज दर सवलत

विदर्भ, मराठवाडाउत्तर महाराष्ट्रडी व डी + क्षेत्रातील औद्योगिक विकासास चालना देण्याकरिता व रोजगार वाढीच्या दृष्टीने या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी रु.1200 कोटी या मर्यादेत या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दर सवलत देण्यात येते.

सौर उर्जेसंबधी धोरण लवकरच

सौर उर्जेसंबधी धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता 1 लक्ष पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सौर कृषिपंप 3 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्यात आस्थापित करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून पुढील 18 महिन्यात पूर्ण करावयाचा आहे. खुल्या प्रवार्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के लाभार्थी हिस्सा तर एससी-एसटी प्रवर्गासाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावयाचा आहे. माहे फेब्रुवारी 2020 अखेर या योजेनेंतर्गत 30 हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

००००

विसंअ/ अर्चना शंभरकर/3-3-20/लक्षवेधी विधान परिषद

००००

28 कामगारांना एका महिन्यात मदतआरोग्य योजनेत सफाई कामगारांच्या समावेशासाठी धोरण – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

मुंबई, दि. 3 : गेल्या काही काळात राज्यात मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांपैकी  दोन कामगारांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे. तर उर्वरित २८ कामगारांच्या कुटुंबियांना एका महिन्याच्या आत मदत देण्यात येईल. आरोग्य योजनेत सफाई कामगारांचा समावेश करण्यासाठी येत्या काळात धोरण आखण्यात येईलअसे  असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा. विश्वजित कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी राज्यातील सफाई कामगारांचा विविध दुर्घटनांमध्ये झालेला मृत्यू व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी आर्थिक मदत याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. कदम बोलत होते. अलीकडेच झालेल्या डोंबिवली एमआयडीसी परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची सफाई करताना मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला एमआयडीसीकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचेही श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य मनीषा कायंदेसदस्य सर्वश्री निरंजन डावखरेप्रकाश गजभियेप्रसाद लाडअनिकेत तटकरेप्रशांत परिचालक यांनी भाग घेतला. 

००००