विधानसभा प्रश्नोत्तरे

भेसळयुक्त बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर

फौजदारी गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 2 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टिंगचा वापर केला होता. यामुळे महाबीज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबीन वाणाचे बियाणे मिसळले गेले असल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. भुसे बोलत होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ३५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रकमेचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार असून, सोयाबीन बियाणे एमएयूएस ७१ आणि ६२ यांच्या एकत्रीकरणास जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली. खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून बियाणे, किटकनाशके यांची भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बियाणांच्या भेसळीसंदर्भातील कायदे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, राज्य शासनास त्याप्रमाणे कारवाई करावी लागते. भेसळीसंदर्भातील तक्रारी आल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यरत असून, या समितीस आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारत भालके, सुनिल प्रभु, रणजीत कांबळे यांनी सहभाग घेतला.

०००

मिठागराच्या जागेत परवडणारी घरे बांधण्यासाठी

पर्यवेक्षण, सनियंत्रण समिती गठित – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 2 : विक्रोळी ते मुलुंड या भागातील एकूण मिठागराच्या जागेपैकी 355 एकर जागेत सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. यादृष्टीने बृहत् आराखडा तयार करण्यासाठी शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. यावर पर्यवेक्षण व संनियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या अहवालाअंती हा प्रकल्प राबवायचा की नाही यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत मुंबईतील विक्रोळी ते मुलुंड या जागेतील मिठागराच्या जागेत परवडणारी घरे देण्यासंदर्भात सदस्य अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. मंत्री श्री. थोरात म्हणाले, या परिसरात ४० मिठागरे असून, ३५५ एकर जमीन इतके विकसनशील क्षेत्र उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या क्षेत्रात सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाचा आहे. या मिठागर जमिनी केंद्र व राज्य शासन यांच्या मालकीच्या असल्याने सदर जमिनींच्या विकासासंदर्भात्‍ दोन्ही शासनांच्या समन्वयाने धोरण ठरवण्यात येईल.या जमिनींच्या सर्वेक्षणाचे काम आयआयटी मुंबईकडून जिऑलॉजिकल सर्व्हेद्वारे करण्यात येईल. तसेच, येथे 34 एकरात झोपडपट्टीचे अतिक्रमणही आहे. यासंदर्भातील सर्व निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. थोरात यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनिल प्रभु, रईस शेख यांनी सहभाग घेतला. ०००००

मौजे डिस्कळ येथील गटांच्या नोंदी ३१ मार्चपर्यंत भूमी अभिलेखात घेणार– महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 2 : सातारा जिल्ह्यातील मौजे डिस्कळ येथील गटांच्या नोंदी ३१मार्चपर्यंत भूमी अभिलेखात घेण्यात येतील आणि शेतकऱ्यांना नकाशे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

माथाडी कामगार सुरक्षा कल्याण मंडळाच्या मुदत ठेव रकमेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी२२जणांना अटक

– गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. २ : मुंबई माथाडी कामगार सुरक्षा कल्याण मंडळाच्या मुदत ठेव रकमेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली असून संबंधितांवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, १०० कोटींच्या मुदत ठेव रकमेतून ९०कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. आता त्यापैकी१८कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. संपूर्ण रक्कम वसूल करण्याकरिता पोलिस प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

००००

येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये आठ नवीन बॅराकींचे काम सुरू – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 2 : पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये आठ नवीन बॅराकींचे काम सुरू असून त्यापैकी तीनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बॅराकींचे काम लवकर पूर्ण केले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य राहुल कुल यांनी विविध तुरुंगातील कैदी संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, राज्यात ६०तुरूंग असून पुणे आणि नाशिक येथील तुरूंग ब्रिटीशकालीन आहेत.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांकरिता रुग्णालय असून चार वैद्यकीय अधिकारी, एक मनोविकारतज्ज्ञ, सहा परिचारक आदी कार्यरत आहेत. त्वचारोगासह अन्य संसर्गजन्य आजाराच्या बंद्यांना स्वतंत्र बॅराकींमध्ये ठेवण्यात येते. आठवड्यातून एक वेळ त्वचारोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी कारागृहास भेट देतात. वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून बंद्यांची नियमित तपासणी व आवश्यक ते उपचार केले  जातात.

००००

अजय जाधव/विसंअ/2.3.2020