राज्यातील दहा जिल्हे हत्तीरोग मुक्त; हत्तीरोगाचे २०२१ पर्यंत उच्चाटन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 2020‘चे उद्घाटन

मुंबई, दि.2 : हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 2 मार्च ते 20 मार्च 2020 पर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या 6 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून आंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृतीवर भर द्यावा. सर्व पात्र व्यक्तींना हत्तीरोग गोळ्यांच्या सेवनाची खात्री करुन आपला जिल्हा 2021 पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिम 2020‘चे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या हत्तीरोग मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर स्वप्नील जोशी आहेत. 

हत्तीरोग यावर आधारित चित्रफित सुरवातीला दाखवण्यात आली. आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील हत्तीरोग  दुरीकरण कार्यक्रम  कशा प्रकारे राबविण्यात येतो त्यांच्या अंमलबजावणी व पूर्वतयारीविषयी माहिती जाणून घेतली.

श्री.टोपे म्हणाले, गुणवत्ता वाढविण्यासाठी गृहभेटीशिवाय शाळा, कॉलेज कार्यालय, कारखाने व गरजेनुसार बूथमार्फत नागरिकांनी गोळ्या सेवन कराव्यात. यासाठी सेवनावर सूक्ष्मकृती नियोजनमाप्रमाणे कार्यवाही व्हावी. सध्या राज्यातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, ठाणे व पालघर या आठ जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांनी 100 टक्के गोळ्या सेवन केल्या जातील याची खात्री करावी. किरकोळ दुष्परिणाम आढळल्यास त्याचे त्वरित उपचार करण्यासाठी त्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात यावे. चालू वर्षी नागपूरसह, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये आयव्हरमेक्टीन, डीईसी व अल्बेंडॅझोल या ट्रिपल ड्रग थेरपीनुसार मोहीम राबविण्यात येणार आहे.

नांदेड, गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल हत्तीरोग विरोधी गोळ्याचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी व्यक्ती वगळून सर्व व्यक्तींना मोहिमेअंतर्गत गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. मागील वर्षांपर्यंत या मोहिमेमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल या दोन गोळ्यांचा समावेश होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयव्हरमेक्टीन या अत्यंत प्रभावी औषधाचा अंतर्भाव प्रायोगिक तत्वावर नागपूर जिल्ह्यात केला. या तीन गोळ्यांचे सेवन सलग दोन वर्षे सर्व पात्र लाभार्थ्यांनी केले तर हे जिल्हेही हत्तीरोगमुक्त होऊ शकतात. असे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. राज्यात एकूण 18 जिल्हे हत्तीरोग प्रवण होते. त्यापैकी 10 जिल्हे हत्तीरोगमुक्त करण्यात आले आहेत. त्याबद्दल आरोग्यमंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून ग्राऊंड लेव्हलवर काम करण्याची जबाबदारी घ्यावी. सर्वांना योग्य औषधे दिली जातात की नाही यांची खातरजमा करावी. यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना  कळवावे. हे काम आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी समन्वयाने पूर्ण करतील, असा विश्वास श्री.टोपे यांनी व्यक्त केला.

यावेळी  आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार,  आरोग्य संचालक पुणे डॉ. अर्चना पाटील आरोग्य संचालक मुंबई डॉ. साधना तायडे, अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपसंचालक परिमंडळ, सहायक संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी, तालुका अधिकारी, गोळ्या खाऊ घालणारे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, लाभार्थी, जागतिक आरोग्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.