महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यावर आनंदाचा व भयमुक्त गोपाळकाला साजरा करू – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0
12

दहीहंडी निमित्त शुभेच्छा देत घरच्या घरी व साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन

मुंबई (दि. ११) : उद्या (दि. १२) रोजी सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे या वर्षीचा दहीहंडी उत्सव साधेपणाने घरच्या घरीच साजरा करावा. महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या आनंदाचा व भयमुक्त गोपाळकाला साजरा करू, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव म्हणजे ढोल ताशांच्या गजरात बाळ गोपाळांच्या गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची चुरस ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची पर्वणीच आहे; परंतु कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे सर्वधर्मीय सण – उत्सवांना यावर्षी खिळ बसली आहे.

अशा वेळी मोठ्या धैर्याने आपल्या भावनांना आवर घालत विविध सण – उत्सव घरच्या घरी व अत्यंत साधेपणाने साजरे करणाऱ्या जनतेचे खऱ्या अर्थाने आभार मानायला हवेत, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

याच काळात आलेल्या दहीहंडी उत्सवावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे सार्वजनिकरित्या दहीहंडी उत्सव साजरा करता येणार नसून, यावर्षी घरच्या घरी व साधेपणाने दहीहंडी उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करावा, तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या आनंदाचा गोपाळकाला भयमुक्त वातावरणात साजरा करू अशा शब्दात श्री.मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here