प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश – पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांचे निर्देश

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार

दुधातील भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कठोर कारवाई करणार

मुंबई दि. १२ : राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात दूध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येत येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

श्री. केदार म्हणाले, दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरिता दुधाचे नमुने तपासण्याकरिता मी स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरिता जाणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाची मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्न निर्मित केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहे. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न शासनाने दूध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. तसेच दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरिता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष रहावे, असे श्री. केदार यांनी सांगितले. 

राज्यात भेसळयुक्त दुध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभिऱ्याने हाताळावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न औषध प्रशासन या विभागाद्वारे दूध भेसळ रोखण्याकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत करावे. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तंत्रज्ञ व्यक्तीनी प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले दूध भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात दूध भेसळ करण्याचे धाडस करणार नाही, अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त  एस.आर. सिरपुडकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.