उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शहिदांना अभिवादन

0
13

मुंबई, दि. १४ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७३व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन केलं आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया, कोरोनाचं संकट आजवरचं सर्वात मोठं संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असूनही कोरोनामुळे तो मर्यादित उपस्थितीत, साधेपणानं साजरा करावा लागत आहे याची खंत सर्वांच्या मनात आहे. असं असलं तरी सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्यं व जबाबदारीच्या भावनेतून आपल्याला हे करायचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणं, देशवासियांचे प्राण वाचवणं, याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्व देशवासियांनी स्वत:चा, कुटुंबाचा, इतरांचाही कोरोनापासून बचाव करुन कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावं. ही आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी देशवासियांना कोरोनामुक्तीच्या लढ्यास सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिलं. त्या सर्वांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणावाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचं, राज्यभरातील लोकप्रतिनिधींचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. राज्यातील जनतेनेही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियम व संयम पाळून मोठा त्याग केला आहे. सक्रीय योगदान दिलं आहे. आपलं योगदान महाराष्ट्र विसरणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेलाही धन्यवाद दिले आहेत.

देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वं, लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात केलं आहे.

०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here