विधानसभा प्रश्नोत्तरे

धुळे महिला रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देणार

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयाला आवारात १०० खाटांच्या महिला रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये रुग्णालयासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि यावर्षी रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न केले जातील,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले. यासंदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ०००००

केंद्र शासनाचे निकष आणि समितीच्या शिफारसीनुसार

ट्रॉमा केअर सेंटरना मंजुरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: केंद्र शासनाचे निकष आणि राज्यात गठित केलेल्या समितीच्या शिफारशी या धोरणानुसार राज्यातील आवश्यकता असलेले ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण केले जातील. भविष्यात अशा सेंटरना या धोरणानुसारच मंजुरी दिली जाईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य शेखर निकम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले,राज्यात असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर ज्या उद्देशाने सुरू करण्यात आले ते पूर्ण होताना दिसत नाही. त्याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. ट्रॉमा केअर सेंटरबाबत केंद्र शासनाने केलेले निकष आणि समितीच्या शिफारशीनुसार गरजेच्या असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरना पूर्ण केले जाईल.

यावेळी झालेल्या एका उपप्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी सांगितले की राज्यात आरोग्य संस्थांमध्ये विशेषज्ञ भरण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. महाड येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भूलतज्ञ तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील प्रभू,संजय सावकारे,अमित झनक,भास्कर जाधव यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

 

आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यासाठी

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून निधी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होणार आहे, त्यातून पूर्ण करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे अशी कामे यावर्षी पूर्ण केली जातील,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाबाबतचा प्रश्न विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यातील आरोग्यसंस्थांच्या बांधकामाबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले,राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य संस्थांची बांधकामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा निधी मिळाल्यानंतर अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आरोग्य संस्थांमधील रिक्तपदांबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले,ही पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांच्या समितीला अधिकार देण्यात आले आहेत. उपकेंद्रामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत ती ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरली जातात. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरावी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.

आदिवासी विकास विभागात कार्यरत डॉक्टरांना वेतनासोबत विशेष लाभांश देण्याबाबत विचार केला जाईल,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे,रणधीर सावरकर,माणिकराव कोकाटे,नितेश राणे,शामसुंदर पाटील,श्रीमती देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

आरोग्य विभागात विशेषज्ञांची ५७४ पदे तीन महिन्यात भरणार 

राज्यभरातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यासाठी निधी उपलब्ध – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: आरोग्य विभागात विशेषज्ञांची रिक्त पदे तीन महिन्यात भरण्यात येणार असून सुमारे ५७४ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमधील सुमारे ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी विदर्भातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की,राज्यात विशेषज्ञांची ९१३ पदे रिक्त आहेत. त्यातील ३०४ पदे सरळसेवेने तर २७० पदोन्नतीने अशी एकूण ५७४ पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही पदे भरल्यानंतर त्यांना चक्राकार पद्धतीने नियुक्त्या देण्यात येणार असून विदर्भाला प्राधान्य देण्यात येईल,असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टर,विशेषज्ञांची पदे थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असून लोकप्रतिनीधींनी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही पाठपुरावा करून आपल्या भागातील पदे भरून घ्यावीत. ज्या आरोग्य संस्थेत डॉक्टर अथवा विशेषज्ञांची कमतरता आहे, तेथे रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांची ऑन कॉल सेवा घेता येते असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान,आरोग्य संस्थांमधील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्याची आवश्यकता असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगत यावर्षी किमान ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येतील,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,सदस्य सुलभा खोडके,सदस्य सर्वश्री किशोर जोरगेवार,सुभाष धोटे यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०