मुंबई,दि. 28: राज्यातील गरजू नागरिक आणि प्रशासनासाठी उपयुक्त असलेली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ निर्मित’डिरेक्टरी 2020’चे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
या डिरेक्टरीत राज्य व केंद्र शासन-प्रशासनातील महत्त्वाचे घटक, राज्य शासनाचे मंत्री, तसेच, राज्यातील पोलीस यंत्रणा, मंत्रालयाच्या सर्व विभागांतील सहसचिव व उपसचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राज्यातील माहिती आयुक्त, अन्य राज्यांचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची माहिती, त्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट आहेत.
गरजू नागरिकांसाठी डिरेक्टरीची उपयुक्तता वाढावी यासाठी सर्व खातेप्रमुख, महामंडळे, पोलीस अधीक्षक, राज्याचे लोकायुक्त, निवडणूक आयुक्त, प्रमुख रुग्णालये, शासकीय विश्रामगृहे, प्रमुख शहरांचे एसटीडी कोड व जिल्हा मुख्यालयांचे पिन कोड, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची कार्यालये, प्रमुख वृत्तपत्रे, राज्यातील पर्यटन स्थळे, राज्यातील एस टी डेपोंचे दूरध्वनी क्रमांक त्याचबरोबर, पारदर्शक व संवेदनशील प्रशासनासाठी कार्यसंस्कृती/पगारात भागवा अभियान, महासंघाचे पदाधिकारी, संलग्न खातेनिहाय संघटनांची माहिती तसेच राज्य शासनातील विविध विभागांची संकेतस्थळे आदी माहितीही समाविष्ट केलेली आहे.
मंत्रालयात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, मंत्रालय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र धनावडे, महासंघाचे उपाध्यक्ष विष्णू पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस.एम. पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, सहचिटणीस मुख्यालय सुदाम टाव्हरे, राज्य संघटक रमेश जंजाळ आदी उपस्थित होते.