पंडितजी जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत!

0
12

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंडित जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि 17 : पंडित जसराज नावाचा तारा संगीत क्षेत्रातून निखळला आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात जणू अंध:कार पसरला आहे. स्वर्गीय संगीताचा आनंद पंडितजींनी या भूतलावरील प्रत्येक कणाकणांना दिला. आता ते जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, पंडितजी हे गायक म्हणून जितके थोर होते, तितकेच मनुष्य म्हणूनही महान होते. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, हास्य हे त्यांच्या गळ्यातून निघणाऱ्या सुरांइतकेच दिलखुलास होते. पृथ्वीवरील सातही महाद्विपांवर सुरांची बरसात करणारे ते एकमेव गायक होते. त्यांच्या सन्मानार्थ एका ग्रहाचं नाव नासाने ‘पंडित जसराज’ असे ठेवले, हा या देशाचा बहुमानच म्हणायला हवा.

पंडितजी जुगलबंदीचे बादशहाच होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, जिथे जिथे सूर्याची किरणे पोहोचत होती तेथे तेथे पंडितजींचे सूर पोहचले होते. अण्टार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर पंडितजींचं गायन झालं होतं. आकाश आणि जमिनीचा कण न् कण त्यांच्या सुरांच्या बरसातीत न्हाऊन निघाला आहे. पंडितजी फक्त शरीराने आपल्यातून गेले. त्यांची गायकी, त्यांचे सूर हे अनंत काळपर्यंत आपल्या हृदयात राहतील.

शिवसेनाप्रमुखांशी ऋणानुबंध

पंडितजींचा जन्म हरयाणात झाला असला तरी त्यांचे संगीताचे कार्य घडविण्यात महाराष्ट्राचा हातभार आहे. पंडितजी महाराष्ट्राचे जावई होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पंडितजींशी ऋणानुबंध होता. मलाही पंडितजींचा स्नेह लाभला. महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेतर्फे मी त्यांना विनम्र आदरांजली वाहत आहे व त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहे, अशा भावोत्कट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here