चंद्रपूर, दि. 17 : चिमूर शहरातील उद्योग, व्यापार, क्षेत्रातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल येथे केले.
रविवारी चिमूर येथील शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे 16 ऑगस्ट क्रांती दिनाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी चिमूर उपविभागीय कार्यालयांमध्ये कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये चिमूर शहरात कोरोना संदर्भातील सुरू असणाऱ्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
या बैठकीला नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसिलदार संजय नागतिलक, मुख्याधिकारी मंगेश खवले, तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर मेश्राम, गटविकास अधिकारी संजय पुरी, जि.प सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, पं.स. सभापती लता पिसे, चित्राताई डांगे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याबद्दल त्यांनी उपविभागीय परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तथापि, पुढील काळामध्ये गावात नव्याने येणाऱ्या नागरिकांची व व्यापार-उद्योग क्षेत्रात असणाऱ्या व लोकांच्या सातत्याने संपर्कात येणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी करण्यात यावी. जेणेकरून शहर आणखी सुरक्षित राहील. त्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक गावांमध्ये सरपंच यांच्यासह एक चमू करण्यात आली असून याच्या मार्फत प्रत्येक नागरिकाची नोंद घ्यावी, कोरोना आजारास संदर्भात तपासणी करणे आवश्यक आहे. थोडे जरी आजारी वाटत असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती घेतली. जिल्ह्यात व चिमूर उपविभागात देखील डॉक्टरांची कमतरता असल्याचे पुढे आले. याशिवाय या ठिकाणचे डायलिसीस सेंटर व सोनोग्राफी सेंटर या दोन्ही यंत्रणा बळकट करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
रेतीघाट, संदर्भात काही तक्रारी आल्या असल्याचे निर्देशास आणून दिले. यासंदर्भातील प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, जनावरांच्या लसीकरणाला गती द्यावी,चना खरेदीची थकीत रक्कम मिळावी, तसेच अन्नधान्य वितरण आणखी सक्षमतेने व्हावे, असे निर्देश दिले. उपस्थित काही पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले.
दुपारच्या सत्रात त्यांनी सिंदेवाही तहसील कार्यालयामध्ये कोरोना संदर्भात बैठक घेतली. तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.