मुंबई, दि. १८: रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.
रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी श्री. भरणे यांनी या सूचना दिल्या. बैठकीस रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करून आणल्यानंतर मासे विक्रीसाठी तसेच मत्स्यप्रक्रियेसाठी ससून डॉक येथे जाता येत नाही. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने त्यांनी या बैठकीचे आयोजन केले. श्री. भरणे यावेळी म्हणाले की, सध्याच्या कोरोना परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे असल्याने अगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासे उतरविण्यास आणि विक्रीस परवानगी देणे धोक्याचे होईल. त्याऐवजी मुरुड, आगरदांडा परिसरात सोयीस्कर जागी कायमस्वरूपी जेट्टी उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आणि मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी दौरा करून कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव पाठवावा. तोपर्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या जेट्टींची पाहणी करून तेथे मासे उतरवण्याची तसेच विक्री तसेच त्या अनुषंगाने अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिले.