न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
7

मुंबई, दि. 28 : न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

श्री.कोश्यारी म्हणाले, भारतातील महाराष्ट्र राज्य हे विविध क्षेत्रामध्ये प्रगतीशील राज्य आहे.या ठिकाणी उद्योग, वाणिज्य यासह पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत.भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये व्यापार, वाणिज्य यासह पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात संबंध वाढावेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा असलेल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती दिली.

यावेळी भारतातील उद्योग क्षेत्र, लोकशाही व्यवस्था, संसदीय कार्यपद्धती, महाराष्ट्राने विविध क्षेत्रामध्ये केलेली प्रगती, न्यूझीलंड देशातील उद्योग व वाणिज्य क्षेत्र, लोकसंख्या आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

न्यूझीलंडमध्ये जवळपास अडीच लाख भारतीय नागरिक विविध क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच न्यूझीलंड येथील नागरिक भारतामध्ये कार्यरत आहेत. यामुळे आजवर दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे संबंध राहिले आहेत, असे श्री. विस्टन पिटर्स यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी उपप्रधानमंत्री श्री.पिटर्स यांना गेट ऑफ इंडियाची प्रतिमा भेट म्हणून दिली.

००००

प्रवीण भुरके/28.2.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here