महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यापैकी ५४२ जणांनी नेमणूक स्वीकारली नाही.

या ५४२ पैकी ५५ जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी याकरिता अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गृहमंत्री महोदय यांच्यासमवेत पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची सविस्तर बैठक नुकतीच संपन्न झाली. महामंडळाने या उमेदवारांवर प्रशिक्षणासाठी खर्च केलेला आहे. तो पाहता तसेच या उमेदवारांच्या नोकरीची निकड पाहता या सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचे चर्चेअंती ठरले.

त्या ५४२  पैकी जे उमेदवार नेमणुकीसाठी अर्ज करतील, त्यांना महामंडळात नेमणूक दिली जाईल, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

00000

वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर