उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. 20 : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.

आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते  उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भोगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे. गठीत केलेल्या  समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत याचा सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही श्री.सामंत यांनी केल्या.

बैठकीस उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000