चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीस पाठपुरावा करु – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर, दि. २० : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्रधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर उभारणीस आवश्यक असणाऱ्या जागेस निधी मिळवून देण्यास आणि या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी पाठपुरावा करु, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चंदगड येथे बोलताना केले.

चंदगड तहसील कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरपंचायतीच्या अध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सभापती आनंद कांबळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, गेले चार-पाच महिने राज्य शासन कोरोनाशी लढा देत आहे. या लढ्यात राज्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यासह अन्य यंत्रणा चांगले काम करत आहेत. यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण यशस्वी होऊ. चंदगड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या ट्रामा केअर सेंटरसाठी एमआयडीसीकडील जमिनीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. चंदगड व परिसारातील ग्रामीण जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा एका छताखाली मिळाव्यात यासाठी या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीही पाठपुरावा केला जाईल. चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, राज्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. कर्नाटकातील के.एल.ई. हॉस्पिटलचाही योजनेत समावेश केल्याने येथे उपचारसाठी येणाऱ्या राज्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रवळनाथ पतसंस्था, चंदगड अर्बन बँक आणि वेणू गोपाल पतसंस्थेमार्फत चंदगड ग्रामीण रुग्णालयास ५ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ रुग्णालयास उपलब्ध करुन दिले जाईल. चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राध्यान दिले जाईल. चंदगड तालुक्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब होती. मात्र प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच आज चंदगड तालुक्यात रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येते. प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. यापुढील काळात तालुक्यात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत यासाठी दक्ष रहावे, असे ही श्री. यड्रावकर म्हणाले.

काजू उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार-खासदार मंडलिक

चंदगड तालुका कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेशी जोडलेला तालुका आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात काजुचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांना काजू उत्पादनासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मंडलिक यावेळी म्हणाले.

खासदार श्री. मंडलिक म्हणाले, राज्यात आरोग्याची सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. चंदगड तालुक्याने कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केल्याने आज तालुक्यात रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र पुढील काळातही ग्रामस्थानी व यंत्रणनेने दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे. ग्रामीण भागात आयसीयुसह आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार फंडातून १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. चंदगड तालुक्यात ट्रामा केअर सेंटर उभारावे. तालुक्यास शव वाहिका मिळावी तसेच तालुक्यातील आरोग्य विभागाकडील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार श्री. पाटील म्हणाले, कोरोना लढाईत चंदगड तालुक्याने महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामध्ये प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहे. तालुक्यात आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी आमदार फंडातून देण्यात आलेल्या रुग्ण्वाहिकेमुळे रुग्णांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाकडील रिक्त पदे भरावीत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना व्हाव्यात. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरघोस भरपाई मिळावी, असेही ते म्हणाले.

प्रारंभी प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात चंदगड तालुक्यातील कोरोना रुग्ण, प्रशासनामार्फत केलेल्या उपाय योजना याबाबात माहिती दिली. तहसीलदार श्री. रणवरे यांनी आभार मानले.

तत्पुर्वी आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून चंदगड ग्रामीण रुग्णालयासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.