डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडचणींसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

0
10

मुंबई, दि. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यासाठी विद्यापीठाच्या ज्या अडचणी आहेत त्या तातडीने दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

आज मंत्रालयात दुरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. सामंत म्हणाले, जालना येथे कौशल्य विकास अभियानातंर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा. तसेच घनसांगवी येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या अडचणी आणि निधीसंदर्भात मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त भटक्या व विमुक्त जाती – जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्मिती, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रास मुदतवाढ देणे, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस स्थैर्य प्राप्त करून देणे, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुलींच्या वसतिगृहासाठी पदनिर्मिती प्रस्ताव, २०१८-१९ च्या खरीप हंगामातील दुष्काळ सदृष्य तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, संतपीठा तातडीने सुरू करण्यासाठी सर्व प्रशासकीय बाबीची पूर्तता करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि विद्यापीठाच्या सर्व अडचणी सकारात्मकपणे सोडविल्या जातील आणि याबद्दल पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

नोडल अधिकारी नेमावा अशा विद्यापीठांना सूचना

राज्यशासन आणि विद्यापीठे यांच्यात योग्य  समन्वय राहावा यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी नोडल अधिकारी नेमावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होईल अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.

या बैठकीस तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here