नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजॉब्सचा पर्याय राज्यासमोर ठेवला आहे.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून दि. 6 जुलै 2020 या दिवशी सुरू केले. याचेच आता महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या महाजॉब्स ॲपचे उद्‍घाटन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले.

काय आहे महाजॉब्स?

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे.

महाजॉब्स पोर्टलची निर्मिती झाली ती, नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक याच्यामधील दुवा तयार करण्यासाठी. निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे हा या महाजॉब्स पोर्टलचा मुख्य उद्देश. यामुळे उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे शक्य होणार आहे. महाजॉब्समुळे महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण झाली आहे.

महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक कंपन्या आता पुढे सरसावल्या आहेत. अडीच ते तीन हजार कंपन्यांनी नोकरी देण्यासाठी रजिस्ट्रेशनही केले आहे. महाजॉब्स पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 2 लाख 70 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तर, 22 हजार 355 नोकरी मागणाऱ्यांचे अर्ज आले आहेत.  पोर्टलच्या माध्यमातून 162 उद्योजकांमार्फत सुमारे 4,500 कामगारांना नोकरी देण्याची प्रक्रिया चालू झाली असून सुमारे 500 कामगारांना आतापर्यंत नेमणूक पत्र देण्यात आले आहे.

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरावाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्या सूचना महत्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्याकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे या दोघांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाजॉब्स ॲप

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्स हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले. आतापर्यंत  सुमारे  764 लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

मोबाईल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य झाले आहे, आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येते. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळते आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत झाली आहे.

मोबाईल ॲप वापरण्यासाठी ही माहिती आवश्यक

  • वैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)
  • मोबाइल क्रमांक (आवश्यक)
  • इमेल आयडी (वैकल्पिक)
  • अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा
  • पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक)

महाजॉब्स मोबाईल ॲपचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

  • सुलभ नोंदणी प्रक्रिया, नोकरी शोधणारे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल, आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतो.
  • नोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिल्ह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.
  • नोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उद्योगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.
  • नोकरी शोधणारे अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात.
  • नोकरी शोधणारे अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात. उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॉगिन करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येतो.
  • फ्रेशर्स तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
  • नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामुल्य आहे.
  • अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे.

राज्यशासनातर्फे ॲप आणि वेबपोर्टलच्या माध्यमातून नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांच्यादरम्यान एक भक्कम सेतू उभारण्याचे काम झाले आहे. आता आवश्यकता आहे, ती स्थानिक उद्योजकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या कामगारांची मागणी करण्याची आणि स्थानिक तरुणांनी या उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची. तर आजच आपल्या स्मार्ट फोनच्या प्लेस्टोअर मधुन  https://play.google.com/store/apps/details?id=com.mahajobs या लिंकवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करा, किंवा  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन आपला प्रोफाईल पुर्ण करा.

अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय