मुंबई, दि. २३ : रोजंदारीवर सोबत काम करणारी पत्नी विजेच्या तारेचा धक्का लागून अचानक मृत्यूमुखी पडली. तीन मुलांना सांभाळणे, लॉकडाऊनमुळे आलेले गंभीर आर्थिक संकट आणि कमावणारी जीवनसाथी गेल्याने कोलमडून पडलेला संसार.. मदत मिळवून देण्यासाठी पीडित कुटुंबाने मदतीची साद घातली.. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकाराने मदत मिळाली आणि संसार उभा रहायला एक भक्कम आधार मिळाला!
शीळ फाटा येथे टोरंट कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला. डॉ.राऊत यांच्या प्रयत्नामुळे मयताच्या पतीला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई टोरंट कंपनीकडून देण्यात आली आहे.
जून महिन्याच्या १६ तारखेला सकाळी ९ वाजता मयत रिजवाना इरफान अन्सारी या रेशन आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शीळ फाटा येथील नेता कंपाऊंड येथे पाण्यात टोरंट कंपनीची प्रवाहित वीज वाहिनी तुटून पडल्याने विजेचा धक्का लागून रिजवाना हिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे रोजंदारीचे काम करणाऱ्या रिजवाना अन्सारी हिच्या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले. तिच्या मृत्यूमुळे तिचे ३ लहान मुले आई विना पोरकी झाली. रोजंदारीचे काम करणाऱ्या तिच्या पतीवर त्यांचा सांभाळ करण्याची पाळी आली. त्यामुळं त्यांचे दैनंदिन उत्पन्नही ठप्प झाले.
या घटनेची दखल या भागातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस इसहाक शेख इनामदार यांनी घेतली. शेख यांनी ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांना पत्र पाठवून त्वरित मदत करण्याची विनंती केली. त्यावर ऊर्जामंत्री यांनी टोरंट कंपनीच्या व्यवस्थापनाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. टोरंट कंपनीने नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश मयताचे पती इरफान अन्सारी यांना सुपूर्द केला असून यामुळे अन्सारी कुटुंबाची उपासमार टळली आहे.
“लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने मी घरीच होतो. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केलेल्या मदतीमुळे माझ्या मुलांना आर्थिक आधार मिळाला,” अशा शब्दात इरफान अन्सारी यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानले. या मदतीसाठी पाठपुरावा करणारे शेख यांनी ही मंत्री राऊत यांचे आभार मानले आहेत!