मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वरळीत प्रभात फेरीचे आयोजन

0
14

मुंबई दि.27 : महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने कविवर्य कुसुमाग्रज जयंती म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वरळी सी फेस येथे प्रभात फेरीचे आयोजन केले.या प्रभात फेरीत वरळी सी फेस बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते. यानिमित्ताने बोलताना ते म्हणाले, “मराठी ही अत्यंत सुंदर व समर्थ भाषा आहे, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कोणत्याही भाषेच्या कुबड्यांची गरज नाही. आपल्या मातृभाषेबद्दल आपल्या सर्वांनाच प्रेम, आपुलकी आहेच, मात्र आजच्या मराठी भाषा गौरव दिनी ते व्यक्त करणं हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज येथे ही महापालिका शाळेतील मुले प्रभात फेरीच्या माध्यमातून ज्या उत्साहाने आपले मातृभाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करीत आहेत, ते पाहून मला आनंद वाटला.”

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. संजय कृष्णाजी पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका बागेश्री केरकर व नम्रता सावंत तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

मराठी भाषेची गोडी वाढावी व आपल्या रोजच्या जीवनात जास्तीत जास्त प्रमाणात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेने या प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

मराठी भाषा संवर्धनासाठीच्या वेगवेगळ्या घोषणा देत शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली. मराठी भाषा विभागाने या प्रभात फेरीसाठी मोलाची मदत केली तसेच नायर रुग्णालयाने वैद्यकीय मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here