विधान परिषद प्रश्नोत्तरे

0
7

औरंगाबादमधील सातारादेवळाई भागात विकासकामांवर भर देणार मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : सातारा-देवळाई नगर परिषद औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर येथील विकासकामांवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. शिंदे म्हणाले, सातारा- देवळाई  भागाकरिता महानगरपालिकेकडून रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग, भूमिगत गटारे, सरकारी नाल्यांवर पुलाचे बांधकाम करणे, आरोग्य केंद्र उभारणीसाठी इमारतींची  दुरुस्ती व नाल्यातील गाळ काढणे इत्यादी कामे करण्याचे नियोजित आहे. या भागात एकूण 43  विकासकामे करण्यात आली असून त्यासाठी  1.98 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.  याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दिडशे कोटीचा निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सतिश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कांदिवलीतील सार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे आरक्षण कायम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : पोईसर (कांदिवली) पूर्व येथील भूखंड हे विकास आराखड्यानुसार सन 2034 पर्यंत सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित असून प्राथमिक, माध्यमिक शाळा, क्रीडांगण व नियोजित रस्ता यासाठीचे आरक्षण हे कायम राहील, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.  शिंदे म्हणाले, मौजे पोईसर, कांदिवली पूर्व येथील विशिष्ट भूखंडाच्या जमीन मालकाने हा भूखंड महानगरपालिकेस बजावलेल्या खरेदी सूचना नगररचना अधिनियमातील तरतुदींशी विसंगत वाटल्याने महानगरपालिकेने त्या अस्वीकृत करून स्वाधिकारात भूसंपादनाचा प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत सुधार समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र हा भूखंड सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असल्याने यावरील आरक्षण व्यपगत होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार, प्रसाद लाड, गोपीकिशन बाजोरिया, किरण पावसकर, जोगेंद्र कवाडे, प्रविण दरेकर, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना दिनांक 1 जानेवारी 2006 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2010 या कालावधीतील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. निर्णय घेऊन 1 डिसेंबर 2010 पासून सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही थकबाकी देय नाही, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्ती वेतन, थकित महागाई भत्ता देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार,  अनिल सोले, भाई जगताप आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

रायगड जिल्ह्यातील साळावा-रेवदंडा खाडीवर नवीन पूल बांधणार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 26; रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले असून पुलाचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. दुरुस्तीची निविदा काढण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल असे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. भरणे म्हणाले, रायगडचे जिल्हाधिकारी यांनी अति अवजड वाहनांना या पुलावरून प्रवेशास बंदी घातली आहे. रेलिंगची दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच पुलावरील रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील, अनिकेत तटकरे, भाई जगताप, प्रविण दरेकर आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ विधान परिषद प्रश्नोत्तरे/26-2-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here