महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाची फिनलँड संसदीय शिष्टमंडळाकडून पाहणी

0
6

मुंबई, दि. 26 : फिनलँडच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषदेतील कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही देशातील संसदीय  कार्यपद्धतीसंदर्भात विधानभवनात पीठासीन अधिकाऱ्यांसोबत  बैठक झाली.

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, राज्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कृषी उत्पन्नावर संशोधन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावर चर्चा करुन फिनलँडने यासाठी सहकार्य करावे, असे प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवण्यात आले. तसेच फिनलँडमधील  मोफत शिक्षण याचा अभ्यास करण्यासाठी फिनलँड येथील विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील विद्यापीठाचा सामंजस्य करार करता येईल का यावर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासासाठी एक समिती गठित करावी, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

फिनलँड संसदीय शिष्टमंडळात वित्तीय समितीचे अध्यक्ष जोहान्स कोस्कीन, अँडर्स अँडलेरक्रूझ, सदस्य इवा जोहना एलोरांटा, सदस्य सँनी ग्रॅहॉन-लॅसेनन, सदस्य एस्को किविरंता, सदस्य जुक्का कोपरा, सदस्य मेर्जा कायल्लोनेन, सदस्य पिया लोहिकोस्की, सदस्य आरीस सुमेला, सदस्य जस्सी विहोनेन, सदस्य हेलवी इकावल्को, फिनलँडचे भारतीय राजदुत रिल्वा कोक्कु-रोंडे, फिनलँड देशाचे वाणिज्यदुत मिक्को पॉटसोनेन, जुक्का होलाप्पा, फिनलँडचे मुंबई, गुजरात, गोवा या राज्यासाठींचे वाणिज्यदूत श्रेयस दोषी उपस्थित होते.

००००

काशिबाई थोरात/वि.सं.अ./26/02/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here