सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम
मुंबई, दि. 28 : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 व्या वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत हेाते. व्यासपीठावर योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र, मदन बहल, ऋषी योगेंद्र उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, योगविद्येशी भारताचे घट्ट नाते आहे. योगामुळे मानवी मन सकारात्मक विचार करते. मनाला नियंत्रित करण्याची क्षमता योगात आहे. योगामुळे अनेक व्याधीं दूर राहतात. आजच्या काळात आपल्या देशातील योग शिक्षणाची परंपरा जीवंत ठेवण्यात योगा इन्स्टिट्यूटने मोलाचे कार्य केले आहे. संस्थेने योग परंपरा शंभर वर्षांपासून जपल्याची बाब कौतुकास्पद आहे, असे सांगत राज्यपालांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. महानगर पालिकांच्या शाळेत गेल्या 25 वर्षांपासून संस्था योग शिक्षण देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 60 शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.