महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0
9

मुंबई, दि. 27 : महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराच्या विरोधातले खटले वेगाने निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन असे प्रकार करणाऱ्यांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले.

श्री.शिंदे यांनी आज मंत्रालयात यासंदर्भात विधी व न्याय विभाग आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी महिला अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणांमधील तपासात कशा प्रकारे सुधारणा करता येईल, कमीत कमी वेळेत खटले कसे निकाली काढता येतील, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल, यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील अस्तित्वातील कायद्यांचा अभ्यास करून त्यात अधिक सुधारणा करण्याच्या दिशेने, आरोपीला कमीत कमी वेळेत शिक्षा व्हावी, यादृष्टीने कायद्यात काय सुधारणा करता येतील आणि अधिक कठोर कायदा कसा करता येईल, याबाबतचे प्रारूप तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

गुन्हेगारांवर वचक बसवायचा असेल तर अधिक कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरच कायदा केला जाईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

बैठकीस विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विशेष पोलीस महानिरिक्षक मिलिंद भारंबे, प्रताप दिघावकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here